पुणे: ससून रूग्णालयात म्युकोरमायकॉसीस आजारावरील शंभरावी शस्त्रक्रिया पार पडली

पुणे,४ जून २०२१: कोरोना महामारीपाठोपाठ गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकॉसीस / काळी बुरशी हा नवीन आजार जनतेला भेडसावत आहे.शहरातील ससून रुग्णालयात या गंभीर स्वरूपातील आजारावरील रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णालयाने यासंदर्भातील शस्त्रक्रियेची शंभरी गाठली आहे.

ससून रुग्णालयात म्युकरमायकोसिस संदर्भातील शंभरावी शास्रक्रिया गुरुवारी( दि. 3) रोजी पार पडली. रुग्णालयात म्यूकोरमायकॉसीसची समस्या सुरु झाल्यापासून, २०१ हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. दररोज ७-८ नवीन रुग्ण भरती होत आहे. या शस्त्रक्रियामध्ये आता पर्यंत १०१ फेस आणि स्कलबेस शास्रक्रिया, २ क्रेनियोटॉमी, २ कॅन्सर आणि म्युकोरमायकॉसीस संबंधित शस्त्रक्रिया यांचा समावेश होता. या व्यतीरिक्त ११ रुग्णांच्या मेंदूच्या रक्त वाहिनी मध्ये बुरशीचा संसर्ग असल्याने शस्रक्रिया करण्यात आली आणि ४ रुग्णांच्या मेंदूमध्ये बुरशीमुळे पू झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. यापैकी बहुतांश शस्त्रक्रिया शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत करण्यात आल्या. तसेच या आजाराच्या उपचारासाठी लागणारे इंजेक्शनची व्यवस्था प्राध्यापक व जन आरोग्य योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. भारती दासवानी यांनी केली.

या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे व उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय जाधव यांचे अमूल्य सहयोग लाभले. या शस्त्रक्रिया रुग्णालयाचे कान नाक व घसा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. समिर जोशी, यांच्या नेतृत्वाखाली डॉ. राहूल तेलंग, डॉ. संजयकुमार सोनावले, डॉ. अफशान शेख, डॉ. किरीट यथाटी, डॉ. चेरी रॉय यांनी केल्या.

त्यांना डॉ. संयोगिता नाईक, डॉ प्रज्ञा भालेराव , डॉ सुरेखा शिंदे व डॉ शीतल यांचे योगदान लाभले. या बुरशीचा संसर्ग डोळयांना झाल्यामुळे दृष्टी गमावलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन नेत्रतज्ञ डॉ. संजीवनी आंबेकर, डॉ. सतीश शितोळे यांच्या तर्फे करण्यात आले.

म्युकोरमायकॉसीसचे वैद्यकीय व्यवस्थापन हे औषध विभाग प्रमुख डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. शशिकला सांगले, डॉ नेहा सुर्यवंशी व डॉ.महेश दराडे यांच्याद्वारे करण्यात येत आहे. या सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अधिसेविका सुनिता खतगावकर व परिसेविका निर्मला पवार, मार्गारेट जगले, सिद्धार्थ जाधव यांचे योगदान लाभले.