पुणे, १६/०६/२०२१: सुरुवातीला काही मित्रांसोबत पूजा पत्री, समिधा विकणाऱ्या एका आदिवासी तरुणाने औषधी वनस्पती लागवडीच्या प्रशिक्षणाच्या आधारे कोट्यवधीमध्ये व्यवसाय केला आहे. आज यामुळे आदिवासी भागातील १८०० लोकांना रोजगारही प्राप्त झाला आहे.
सुनील पवार हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील असून त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी जंगलातून पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती गोळा करण्याचे काम हाती घेतले. त्यातून थोडा फार पैसा हाताला लागत त्यातून ते स्वतःचा खर्च भागवत. मात्र एका कार्यक्रमात त्यांना आयुष मंत्रालयातर्गत येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन केलेल्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्राविषयी माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या विभागातून औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी याचे प्रशिक्षण घेतले. तो कोरोना काळ असल्याने त्याच काळात गुळवेलला मोठी मागणी निर्माण झाली होती. त्याच वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही गुळवेल प्रकल्प हाती घेतला होता. त्या वर्षी पवार यांनी ३४ टन गुळवेलची विक्री केली. तर यंदाचे वर्ष पूर्ण होण्याआधीच जानेवारी ते जून महिन्यात १०० टन गुळवेलची निर्मिती झाली आहे.
विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागीय केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट म्हणाले, या काळात गुळवेलचं उत्पादन कसं घ्यावं, त्याची साठवणूक कशी करावी तसेच त्याची विक्री कुठे करावी याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार त्यांना अनेक आयुर्वेदिक उत्पादन करणाऱ्या संस्थांशी जोडून दिले. आज डाबर, हिमालया, वैद्यनाथ यासारख्या नामांकित कंपन्यांना अनेक औषधी वनस्पती सुनील पुरवतो. यासाठी त्याने आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ६ केंद्र सुरू केली असून त्यात १८०० आदिवासी काम करतात. ज्या आदिवासी नागरिकांना रोज १०० रुपये मिळायचे ते आज यात काम करून ३०० ते ४०० रुपये रोज मिळवतात असेही पवार यांनी सांगितले.
“औषधी वनस्पतीची शेती ही काळाची गरज आहे. अनेक लोक ही शेती करतात मात्र योग्य मार्गदर्शन मिळाले तर व्यक्ती कुठे पोहोचू शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. विद्यापीठात या औषधी वनस्पतीबाबत मोठ्या प्रमाणात काम सुरू असून समाजाला याचा उपयोग होतो आहे.” – प्रा.डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
More Stories
ठाण्याला हरवून पुणे उपांत्य फेरीत
अस्मयच्या हॅटट्रिकने लौकिक एफएचा विजय पीडीएफए फुटबॉल
एमएसएलटीए- पीएमडीटीए एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सार्थ बनसोडेचा मानांकित खेळाडूवर विजय