पुण्यातील गड – किल्ले, पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी; अतिवृष्टी’चा इशारा लक्षात घेत, कलम १४४ लागू

पुणे, १३ जुलै २०२२ : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे १४ ते १७ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व गड – किल्ले पर्यटन स्थळांवर कलम १४४ लागू करण्यात आले असून, नागरिकांना याठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

वाढत्या पावसामुळे डोंगर परिसरात दरड कोसळणे, झाड पडणे तसेच पाण्याचे प्रमाण वाढल्याने पर्यटक धबधब्यात वाहून जाणे, किंवा एखाद्या ठिकाणी अडकणे यासारख्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. असे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सावधता बाळगली जात आहे.
गडकिल्ले, गिर्यारोहण मार्ग व पर्यटन स्थळांवरील संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेवून तेथील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता पर्यटक, गिर्याराहेक व ट्रेकर्स यांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाई केली जाईल.

याठिकाणी असणार प्रवेशबंदी

हवेली : सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक
मावळ : किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, डयुक्सनोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधी वरेखिंड, पवना परिसर
मावळ : राजमाची ट्रेक. किल्ले कातळदरा धबधबा, कोटेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी
मुळशी : अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड रायरेश्वर किल्ला
जुन्नर : किल्ले जीवधन
भोर : रायरेश्वर किल्ला
वेल्हा : किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मनेघाट
आंबेगाव : बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बेलघाट शिडीघाट, गणपती मार्ग)