September 21, 2025

Pune: १३९ कोटींच्या सुरक्षा रक्षक निविदेस मंजुरी, दोन टक्के वाढीव दरने मंजूरी

पुणे, ११ जुलै २०२५: पुणे महापालिकेच्या विविध इमारती, रुग्णालये, उद्याने, मुख्यालय आणि झोन कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी १३९ कोटी ९२ लाख रुपयांच्या निविदेला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या निविदांसाठी तीन ठेकेदार पात्र झाले होते.त्यांनी १६ ते १८ टक्क्यांपर्यंत वाढीव दराने निविदा भरल्या होत्या. मात्र, त्यावर आक्षेप आल्यानंतर प्रशासनाकडून दर कमी करण्यासाठी ठेकेदारांशी चर्चा करत अखेर २ टक्के वाढीव दराने या निविदा मंजूर करण्यातता आल्या आहेत. त्यानुसार, १५६५ सुरक्षा रक्षक नेमण्याचे काम तीन ठेकेदरांना विभागून देण्यात येणार आहेत.

प्रशासनाकडून तीन वर्षांसाठी काढण्यात आलेल्या या निविदांवर सुरूवातीपासून वादग्रस्त ठरल्या होत्या. आधी अटी आणि शर्थी , नंतर महापालिकेने अनियमिततेची कारवाई करूनही पात्र करण्यात आलेले ठेकेदार तर त्यानंतर तब्बल १६ ते १८ टक्के जादा दराने आलेल्या निविदा यामुळे या निविदांवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेचमहापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे कार्यरत सुरक्षा रक्षकांची अचूक संख्या, त्यांचे कामाचे स्थळ, पाळीवार नेमणूक, त्यांना देण्यात येणारे वेतन याची ठोस नोंद नसल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून निविदा मंजूर करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, अखेर प्रशासनाने या निविदांना मंजूरी दिली आहे. त्या सोबतच, आता सुरक्षा विभागाकडून आणखी सुरक्षा रक्षकांची मागणी करण्यात आली असून या वाढीव कर्मचाऱ्यांचा प्रस्तावही पुढील आठवडयात स्थायी समितीत सादर केला जाणार आहे.