पुणे, ४ ऑगस्ट २०२५: उत्तम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाच्या पायाला गोळी लागल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करत अल्पवयीन मुलावर आरोप केला, मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले आहे.
सोमवार, दिनांक ४/८/२०२५ रोजी रात्री सुमारे १.२० वाजता सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन येथे संकेत संजय मोहिते (वय २०, रा. शिवणे) हा तरुण जखमी अवस्थेत दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या उजव्या पायाच्या नडगीला गोळी लागली होती. ही माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी संकेतची चौकशी केली.
सुरुवातीला संकेतने सांगितले की, समद परवेज शेख नावाच्या १७ वर्ष ११ महिन्यांच्या मुलाने पिस्तूल दाखवत असताना त्याच्या हातून चुकून गोळी सुटली आणि ती त्याला लागली. या माहितीनुसार, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुरेवाड आणि त्यांच्या स्टाफने समद शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याचा या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी पुन्हा जखमी संकेतकडे अधिक चौकशी केल्यावर खरी हकीकत समोर आली. जखमी संकेत आणि त्याचे मित्र जाफर सादिक अली शेख (वय २०), पार्श्वनाथ शिरीष चाकोते (वय २५), वैभव लक्ष्मण धावडे (वय २२) आणि सागर प्रदीप कोठारी (वय २२) हे सर्व जाफरच्या घरी एकत्र बसून पबजी गेम खेळत होते. त्याचवेळी सागर कोठारी याने त्याच्याकडील पिस्तूल काढून ते सर्वांना दाखवण्यास सुरुवात केली. पिस्तूल लोड-अनलोड करत असताना ते अडकले.
हे पाहून पार्श्वनाथ चाकोते याने ते पिस्तूल स्वतःजवळ घेऊन हाताळण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पिस्तुलामधून अचानक गोळी सुटली आणि ती थेट संकेत मोहितेच्या पायाला लागली. जखमी झालेल्या संकेतला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालयात नेले.
या गुन्ह्यात जखमी झालेला आणि त्याला जखमी करणारा सर्वजण एकमेकांचे मित्र असल्याने त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी अल्पवयीन समदचे नाव सांगितले होते. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करत घटनेचे स्थळ आणि हकीकत चुकीची सांगितली. त्यामुळे, पोलिसांनी स्वतः फिर्याद दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर