पुणे: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

पुणे, ३१/०८/२०२२: ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे आगमन झाले.

 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंडळाचे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन, मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारीवाल-बालन, भाजप संघटक सरचिटणीस राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरसह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते, गणेशभक्त उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटीलम्हणाले, १८९२ पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आनंद होत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात भाऊसाहेब रंगारी मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

 

दरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू होऊन श्री तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे सकाळ कार्यालय मार्गे पुन्हा मंडपात आली. या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांच्यासह बालन दाम्पत्याने केले. यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात , रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणुक काढत श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.