पुणे: एटीएम कार्डची अदलाबदली करून सहा नागरिकांना गंडा, लोणीकाळभोर आणि हडपसर परिसरातील घटना

पुणे, २९/०६/२०२१: एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना मदतीच्या बहाण्याने कार्ड बदली करून ६ नागरिकांच्या खात्यामधून पैसे काढले आहेत. याप्रकरणी लोणीकाळभोर व हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

लोणाकाळभोर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरवर १९ वर्षाची महिला २१ जून रोजी पैसे काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी एक व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेला होता. तक्रारदार यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पैसे निघाले नाहीत. त्यामुळे पाठीमागे थाबलेल्या तरूणाने त्यांना मदत करण्याचा बहाणा केला.

 

त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन ते आतमध्ये टाकत तक्रारदार यांना पिन क्रमांक टाकण्यास सांगितला. त्यावेळी त्याने तो पीन क्रमांक पाहिला. पैसे काढून दिल्यानंतर हातचलाखी करून त्याने तक्रारदार यांना दुसरेच एटीएम कार्ड दिले. त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून खात्यामधून १२ हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. त्यानंतर आणखी एक महिला दुपारी एकच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आली होती. तिला देखील आरोपीने मदतीच्या बहाण्याने खात्यामधून नऊ हजार रूपये काढून घेतले.

 

कुंजीरवाडी येथील अ‍ॅक्सेस बँकेच्या एटीएम सेंटरवर २० जून रोजी संजय चौधरी हे सायंकाळी पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना देखील सुरूवातीला पैसे निघाले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी थांबलेले एका व्यक्तीने मदतीचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड बदली केले. खात्यामधून २० हजार रूपये काढून घेतले. त्याप्रमाणेच आणखी दोन व्यक्तींचे अशाच पद्धतीने एटीएम कार्ड बदली करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हडपसर येथील सातवनगर परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी ओमप्रकाश यादव हे गेले होते. त्यावेळी त्यांना देखील अशाच पद्धतीने फसविण्यात आले आहे. त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून आरोपीने १४ हजार ५०० रूपये काढून घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.