पुणे: 74 व्या लष्करदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली

पुणे, १५/१/२०२२: 74 व्या लष्करदिनानिमित्त, दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, यांनी पुष्पचक्र अर्पण करून राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.  हा कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रीय युध्दस्मारक येथे कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य पालन करून आयोजित करण्यात आला होता.

15 जानेवारीला लष्करदिन (आर्मी डे) साजरा केला जातो.  1949मध्ये या दिवशी लेफ्टनंट जनरल (नंतरचे फील्ड मार्शल) के.एम. करिअप्पा,भारतीय लष्कराचे पहिले प्रमुख ( कमांडर-इन-चीफ) म्हणून नेमले  गेले होते. दर वर्षी  निःस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्या आणि धैर्य आणि बलिदानाचे सर्वोच्च उदाहरण घालून देणाऱ्या लष्करातील जवानांचा सन्मान केला जातो,

देशाच्या पश्चिम सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या दक्षिण कमांडने स्वातंत्र्यानंतर सर्व मोठ्या लष्करी कारवायांमध्ये भाग घेतला आहे आणि नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्तींच्या वेळी नागरिकांना मदत केली आहे.  74 व्या लष्कर दिनानिमित्त, दक्षिण कमांडच्या अधिकारी आणि सैनिकांनी भारतीय सैन्याची गौरवशाली परंपरा जपण्याची आणि राष्ट्राची अखंडता आणि सुरक्षितता जपण्याची शपथ घेतली.

दक्षिण कमांड प्रमुखांनी या शुभ प्रसंगी सर्व पदांवरील अधिकारी, शूर जवान, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या तसेच दक्षिण कमांडच्या सर्व अधिकारी आणि जवानांना अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून मातृभूमीचे रक्षण करण्याच्या कार्यात स्वतःला समर्पित करण्याचे आवाहन केले.  कोणत्याही आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना सतत मदत करण्याबाबत दक्षिण कमांडच्या वचनबद्धतेबाबत विश्वासही त्यांनी  प्रकट केला.