एसआरपीएफ जवानांकडून रस्त्यावरील गरीब नागरिकांना ध्वजाचे मानचिन्ह व जिलेबी देऊन स्वातंत्र्य दिन साजरा

पुणे, १५ ऑगस्ट २०२१: राज्य राखीव पोलीस बलात कार्यरत असणारे जवान युगराज खानू पुजारी आणि त्यांचे सहकारी यांनी अनोख्या पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शहराच्या विविध भागातील रस्त्यावरील गरीब नागरिकांना भेट देऊन त्यांना ध्वजाचे मानचिन्ह व जिलेबी वाटप केले.

युगराज हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 मध्ये कार्यरत असून लहानपणापासूनच त्यांना खाकीवर्दी व राष्ट्रीय सणांची खूप आवड आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ते पोलिस दलात भरती झाले. तेव्हापासून ते येणारा प्रत्येक राष्ट्रीय सण या पद्धतीने साजरा करतात. गेले सात वर्षे हा उपक्रम 26 जानेवारी व 15 ऑगस्ट यावेळी उत्साहात साजरा होतो एकट्याने सुरू केलेल्या या युगराज पुजारी यांच्या उपक्रमात आता त्यांचे सात ते आठ सहकारी जवान त्यांना साथ देतात.

यंदा देखील 15 ऑगस्ट रोजी संविधान चौक, जांभुळकर चौक, फातिमानगर ,पुलगेट या परिसरात सुमारे 70 ते 80 लोकांना भेटून त्यांच्यासोबत हा उपक्रम राबवण्यात आला. त्यांच्यासोबत संदीप पाटील, दयानंद खाडे, परमेश्वर वीर हे उपास्थित होते.