पुणे: ‘अजून अनलॉक केलेला नाही’ राज्य सरकारचं स्पष्टीकरण!

पुणे,३ जून २०२१: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जिल्ह्यांची ५ टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली असून, त्यानुसार अनलॉक करत असल्याचं जाहीर केलं. मात्र, परिषदेनंतर लगेचच राज्य सरकारच्या माहिती विभागाकडून राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण दिले.

विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर ५ गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि २५ टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केली होती.

मात्र, राज्य शासनाच्या प्रसिद्धी विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राज्यातील निर्बंध उठविण्यात आले नसल्याचे अधोरेखित केले. तसेच टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असेही माहिती व जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.