पुणे: भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार

पुणे, ०८/११/२०२१: शहरातील रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उच्छाद मांडलेला असताना त्यांना बंदोबस्त करण्यासाठी दोन संस्था नियुक्त केल्या जाणार असून, कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रत्येकी १ हजार ५४९ रुपये दिले जाणार आहेत.

शहरात सध्या सुमारे ५ लाख भटकी कुत्रे आहेत. मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळामध्ये कुत्र्यांची टोळी फिरत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. कुत्रे मागे लागून अनेकांचे अपघात देखील झालेले आहेत. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकतीच मुख्यसभेत करण्यात आली होती. तसेच कुत्र्यांची नसबंदी करूही दरवर्षी संख्या कशी काय वाढत आहे? असा प्रश्‍नही विचारत महापालिकेच्या मुंढवा, बाणेर व नायडू रुग्णालय येथील कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया गृहाची दुरवस्था झाली असून, उंदरांचा सुळसुळाट झाला असल्याचेही नगरसेवकांनी मुख्यसभेत निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर या शस्त्रक्रिया गृहांची दुरुस्ती केली जाईल असा खुलासा प्रशासनाने केला होता.

दरम्यान स्वतःच्या किंवा खासगी जागेत पायाभूत सुविधा उभारून कुत्र्यांना तेथे स्वतःच्या वाहनातून पकडून न्यावे, त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करावी, रेबीजचे इंजेक्शन देऊन परत मुळ ठिकाणी नेऊन सोडावे याकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी सहा संस्थांनी अर्ज केले होते. त्यातील दोन संस्थांना हे काम दिले जाणार असून, ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन नवी मुंबई आणि जीवरक्षा ॲनिमल वेलफअर ट्रस्ट या दोन संस्थांना काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

या दोन संस्थांना ३६ महिन्यांसाठी काम देण्यात येणार आहे. भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रति शस्त्रक्रिया १ हजार ५४९ रुपये दिले जातील. जर महापालिकेच्या वाहनातून कुत्र्यांची वाहतूक केली तर शस्त्रक्रियेच्या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली जाणार आहे.