पुणे: कोंढव्यात सराईत टोळक्याकडून तलवारी नाचवित दहशत

पुणे, ८ जून २०२१ – शहरातील कोंढवा खुर्द परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी दोन सराईत आणि त्यांच्या साथीदारांनी तलवारीच्या धाकाने दुकाने बंद केली. त्यानंतर चहाटपरी, भाजीपाला आणि एका दवाखान्याची तोडफोड केली तसेच एका तरूणावर वार करून राडा घातला. ही घटना ७ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास अशरफनगरमध्ये घडली. याप्रकरणी सराईत अरबाज इलियाज खान उरर्फ लॅब (वय २२ रा. अशरफनगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे इतर साथीदार फरार आहेत.

अरबाज खान हा सराईत गुन्हेगार असून सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास त्याने साथीदारांना अशरफनगरमध्ये बोलावून घेतले. हातातील तलवारी हवेत फिरवून आरडा-ओरड करीत परिसरातील दुकाने नागरिकांना बंद करण्यास भाग पाडले. त्याशिवाय चहाची टपरी, भाजीपाला विक्रेत्याचे नुकसान केले. त्यानंतर रूग्णालयाच्या काचा फोडून नुकसान करीत रूग्णांना पळवून लावले. ‘हम यहा के भाई है, हमे डरने का’, असे म्हणत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. परिसरातील गुफरान अन्सारी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. त्याशिवाय इरफान सय्यद याच्या हाताचा चावा घेतला.

सराईत आरोपीने साथीदारांच्या मदतीने अशरफनगरमध्ये गोंधळ घालून तोडफोड केली. त्याशिवाय तरूणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यातील मुख्य आरोपी अरबाजला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे,अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. पाटील यांनी दिली.