पुणे: कोथरूडमध्ये दहशत माजविणारा सराईत स्थानबद्ध, एमपीडीएनुसार ७८ वी कारवाई

पुणे, दि. २८/०८/२०२२: कोथरूडसह सुतारदरा परिसरातील नागरिकांमध्ये दहशत माजणाऱ्या सराईताविरूद्ध एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एपीडीएनुसार केलेली ही ७८ वी कारवाई आहे.

ऋषीकेश राजेंद्र ठाकुर (वय २३ रा.  माताळवाडी फाटा, भुगांव) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडयाचा प्रयत्न, घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.  त्याच्याविरूद्ध कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार ठाकूर याला एक वर्षांसाठी  मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पीसीबी वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी केली.