पुणे: ‘तो’ निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही :- देवेंद्र फडणवीस

पुणे, ४ जून २०२१ : राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी केलेला शपथविधी बराच चर्चेत राहिला होता. नुकतेच त्याबाबत भाष्य करत, ‘तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही’ अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली.

भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

त्यानंतर अवघ्या काही दिवसात हे सरकार पडले होतं. सरकार स्थापन करताना नेमकी आपली काय भूमिका होती? हे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. ‘तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही’, कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस यांनी सांगितले.