पुणे: मद्यपीने वडिलांचा चिरला गळा उरळी कांचनमधील घटनेने खळबळ

पुणे, १०/०६/२०२१: मद्यपी मुलाने मै इनको आझाद करता हू, असे म्हणत वडीलांचा गळा दाबून ब्लेडने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उरळी कांचनमधील तुपे वस्तीवर घडली आहे. रहिम गुलाब शेख (वय ६७, रा. संस्कृती नगर, तुपे वस्ती उरुळी कांचन) असे खून झालेल्याचे नाव आहे. नईम रहिम शेख (वय ३८) असे खून केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. मुलगी शैनाज रशीदखान जामदार (४०) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिम शेख आजारी असल्याने त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. त्यांचीr कोरोना चाचणी करुन घेतली होती. वडील आजारी असल्याने मुलगा रईम शेख याने त्यांच्यासोबत मंगळवारी (दि. ८) वाद घातला होता. भांडणातच त्याने सायंकाळच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना न कळताच रहिम यांचा गळा दाबून ब्लेडने चिरुन खून केला.

त्यानंतर त्याने कुटूंबातील सदस्यांना घटनेची वाच्यता केली तर तुमचा खून करू अशी धमकी दिली होती. मात्र, रहिम यांची मुलगी शैनाज यांनी धैर्य दाखवून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान वडीलांचा खून करुन आरोपी नईम नशेत उरुळी कांचन रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी (दि. १०) वावरत होता. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत खूनाची तक्रार घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील,सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते , वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनास्थळाला भेट दिली.