पुणे: सराईताच्या पत्नीकडून तरूणाच्या गुप्तांगावर वार, व्हॉट्सअप चॅटिंग आले अंगलट

पुणे, दि. १४/११/२०२२- सराईताच्या पत्नीसोबत व्हॉटसअप चॅटिंग करणे तरूणाच्या अंगलट आले आहे. तिने बॉयफ्रेंड आणि इतरांच्या मदतीने संबंधित तरूणाला बोलावून घेत मारहाण करीत त्याच्या गुप्तागावरील कातडी काढून गंभीर जखमी केल्याची घटना १२ नोव्हेंबरला आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

विनायक लोंढे (वय ३०) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक काही दिवसांपासून एका महिलेसोबत व्हॉटसअ‍ॅपवर चॅटिंग करीत होता. संबंधित महिलेच्या पतीचा खून झाला असून तो सराईत गुन्हेगार होता. त्यानंतर तिची एका तरूणासोबत मैत्री झाली होती. मात्र, विनायक वारंवार तिला मेसेज करीत असल्याच्या रागातून महिलेने त्याला १२ नोव्हेंबरला आंबेगाव परिसरातील मंदीरालगत मैदानावर बोलावून घेतले. त्यावेळी तिचे इतर तीन साथीदारही त्याठिकाणी आले. त्यांनी विनायकला मारहाण करीत डोक्यात वार केला. त्यांच्या गुप्तागावरील कातडी कापून गंभीररित्या जखमी केले. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

“व्हॉटसअ‍ॅप चॅटिंगच्या वादातून महिलेसह इतर तिघा आरोपींनी तरूणाला मारहाण केली. त्यांच्या गुप्तागावर वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.”-
अंकुश कर्चे, पोलीस उपनिरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे