पुणे: कोथरूडमधील गोळीबाराचे गुढ वाढले

पुणे, २७/०८/२०२१: शहरातील कोथरुडमधील मेट्रोशेडच्या परिसरात झालेल्या गोळीबाराचे गुढ वाढले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, संबंधीत गोळीबार नेमका कोणी केला याबाबत चर्चा आहे.

जुना कचरा डेपो येथे मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आहे. संबंधित ठिकाणी बुधवारी सायंकाळी गोळीबार झाल्याची माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरूवारी दुपारी पुन्हा मेट्रोशेडनजीक दोन ते तीन गोळ्यांचा पुढचा भाग आढळून आला . दरम्यान, गोळीबारात मेट्रोच्या एका कर्मचाऱ्याचा छातीलाही गोळी चाटून गेल्याचे महामेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी लष्कराशी पत्रव्यवहार करुन त्यांच्याकडे विचारणा केली आहे.

दरम्यान,’कोथरूड येथील मेट्रो कार शेडच्या परिसरात लष्कराच्या कोणत्याही विभागाचे कुठलेही युनिट किंवा फायरिंग रेंज नाही. त्यामुळे सैन्याच्या गोळीबारामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण लष्कराच्यावतीने देण्यात आले आहे.