पुणे: तरूणाची आत्महत्या नव्हे तर खूनच, शवविच्छेदन अहवाल आला

पुणे, २२/१२/२०२२: दारू पिताना झालेली भांडणातून तरूणाने आपल्याच मित्राचा खून करून आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणार्‍याला कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
परेश शंकर कंदारे (29, वय रा. साईकृपा बिल्डींग, लोकमान्य कॉलनी कोथरूड) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.  खून प्रकरणी वसंत अवसरे (28, कोथरूड, लोकमान्यनगर) याला अटक करण्यात आली आहे.
 खून झालेला तरूण आणि आरेापी अवसरे हे दोघेही मित्र असून उच्च शिक्षीत आहे. तसेच दोघेही कॉलसेंटरमध्ये नोकरीस होते. दोघांमध्ये पुर्वी वाद झाले होते. परंतु त्यांची मैत्री होती. घटनेच्या दिवशी ते दारू पिण्यासाठी एकत्र बसले असताना त्यांच्यात पूर्वीच्या त्या भांडणावरून पुन्हा वाद झाले. याच वादातून अवसरे याने कंदारे यांचा गळा आवळून खून केला. नंतर त्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करण्यासाठी फॅनला रस्सी बांधली.
 तसेच सकाळी पोलिसांना याचा माहिती देऊन त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना हा आत्महत्येचा प्रकार नसून खूनाचा प्रकार असल्याचे परिस्थिती जन्य पुरव्यावरून समजले. याप्रकरणात आणखी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आल्यानंतर अहवालातही ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा प्रकार निष्पन्न झाला. त्यानंतर पोलिसांनी अवसरेला बोलवून त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर त्याने दारू पिल्यानंतर आपल्याकडून हे कृत्य झाले असल्याचे सांगितले.