December 2, 2025

Pune: पेन्शनसाठी कागद पात्रांची धावपळ थांबणार, महापालिकेने उपलब्ध करून दिली ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध

पुणे, १९ नोव्हेंबर २०२५: महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रकरणासाठी तसेच दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागत होता. सेवा निवृत्तकर्मचाऱ्यांची धावपळ कमी करण्यासाठी आता महापालिकेच्या वित्त विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पेन्शनसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार असून, ही नवी सुविधा १ नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.

यापूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीपूर्व सहा महिन्यांपूर्वी पेन्शन प्रकरणांची कागदपत्रे संबंधित विभाग प्रमुखांकडून लेखा व वित्त विभागाकडे सादर करावी लागत होती. तसेच हयातीचा दाखलाही पाठवणे बंधनकारक होते. मात्र आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. महापालिकेतील वर्ग १ ते वर्ग ४ मधील २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ (प्रकरण १०, नियम १२२) नुसार पेन्शन योजना लागू आहे.

सध्या महापालिकेत दहा हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, दरवर्षी साधारण ४०० ते ४५० अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होतात. यात सर्वाधिक निवृत्त होणारे कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील असतात. या सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांची अचूक आणि वेळेवर पूर्तता करण्यासाठी तसेच प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्याच्या उद्देशाने ऑनलाईन अर्ज व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.