September 12, 2025

Pune: शिवराज्याभिषेकदिनी शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे होणार भूमीपूजन

पुणे, दि. ४ जून, २०२५ : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दि. ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा शिवसृष्टी येथे संपन्न होईल अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी कळविली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना जगदीश कदम म्हणाले, “१९६७ पासून कार्यरत असलेल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टीची उभारणी आंबेगाव बुद्रुक येथे २१ एकर परिसरात सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत आशियातील एकमेव असा हा ऐतिहासिक प्रकल्प साकारत असून शिवचरित्रासोबतच छत्रपती शिवरायांची शिकवण, स्वधर्म, स्वराज्य, स्वभाषा यांचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने हे कार्य सुरु आहे. सदर प्रकल्पासाठी ४३८.६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होऊन आजवर ५ लाख पर्यटक, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे. आता भूमिपूजनानंतर नजीकच्या भविष्यात तिसऱ्या टप्प्याच्या कामाला गती येईल.”