पुणे: इलेक्ट्रीक साहित्य चोरणाऱ्या राजस्थानातील चोरट्यांना पकडले, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंढवा, ०९/०९/२०२२: ट्रकमधून इलेक्ट्रीक साहित्य चोरून पसार झालेल्या राजस्थानातील चोरट्यांना पोलिसांनी कोंढवा पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे शहरात कोंढवा, लोणी काळभोर, सहकारनगर, वाकड भागात चोरट्यांनी दहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी तेलंगणा, नागपूर परिसरात चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

श्रवणलाल विष्णाराम चौधरी (वय ३०, सध्या रा. पिसोळी, कोंढवा), राजूराम कुशालराम चौधरी (वय ३२, सध्या रा. केसनंद, दोघे मूळ रा. राजस्थान) यांना अटक करण्यात आली. याबाबत अमीरमिया जवळगेकर (वय ४०) यांनी फिर्याद दिली होती.

 

 

जवळगेकर ट्रकचालक कोंढवा भागातील गोकुळनगर भागातील रस्त्यावर त्यांनी रात्री रस्त्याच्या कडेला ट्रक लावला होता. ट्रकमध्ये एका कंपनीचे इलेक्ट्रीक साहित्य होते. चौधरी यांनी ट्रकमधील इलेक्ट्रीक साहित्य चोरुन नेले होते. कोंढवा पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. चौधरी पिसोळीलील गोदामात चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले.

 

चोरट्यांकडून दोन दुचाकी दोन टेम्पो, दोन टेम्पो, इलेक्ट्रीक चिमणी, २५ प्रेशर कुकर असा २३ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराईत चोरटे असून राज्यासह परराज्यात तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले, जगन्नाथ जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील,सतीश चव्हाण, ज्योतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, ज्ञानेश्वर भोसले कारवाई केली.