पुणे: चंदनाची तस्करी करणाऱ्या त्रिुकटाला बेड्या; तब्बल २७ लाखांचे २७० किलो रक्तचंदन जप्त

पुणे, दि. ८ जून २०२१: टेम्पोतून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केले. त्यांच्याकडून तब्बल २७ लाख किमतीचे २७० किलो रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय चंदनवाहतूक करणारा टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. विकी संजय साबळे (वय १९, रा. मांजरी, हडपसर), रोहित रवी रूद्राप (वय २० रा. शिवनेरीनगर, कोंढवा ) आणि अ‍ॅलन कन्हैया वाघमारे (वय २५, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणी विरोधी पथक दोन पेट्रोलिंग करीत असताना, कोंढव्यातून मोटारीतून सोलापूरला चंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार भूषण शेलार आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाने लोणी काळभोर टोलनाक्याजवळ सापळा रचला. त्यानुसार पथकाने परिरातून संशयास्पद चाललेल्या टेम्पो चालकाला थांबवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोत २७ लाख रूपये किमतीचे २७० किलो रक्तचंदन आढळले. याप्रकरणी पथकाने चालक विकी साबळे आणि साथीदार रोहित रूद्राप याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांना चंदन विक्रीचा माल पुरविणाऱ्या अ‍ॅलन वाघमारे याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पथकाने वाघमारे यालाही अटक केली. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, विजय गुरव, राहूल उत्तरकर, शैलेस सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.