टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमासाठी पुण्याला यजमानपदाचा मान

पुणे, 22 नोव्हेंबर 2022 – विविध उपक्रमांमुळे संपूर्ण वर्षभर गजबजलेल्या पुणे शहराला  टेनिस प्रीमियर लीगच्या चौथ्या मौसमाचे आयोजन करण्याचा मान देण्यात आला आहे. अखिल भारतीय  टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ही स्पर्धा 7 ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती टेनिस ंसकुलात रंगणार आहे.

डेक्कन जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय टेनिस संघटनेचे सहसचिव सुंदर अय्यर, पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेचे सचिव अभिषेक ताम्हाणे, तसेच लीगचे सहसंस्थापक कुणाल ठाकुर आणि मृणाल जैन, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.

टेनिसविश्‍वातील अत्यंत अभिनव अशा या लीगचे आयोजन पुण्यात प्रथमच होत आहे. यासाठी टेनिससंकुलात एक सेंटर कोर्ट आणि चार अन् कोर्ट तयार करण्यात आली आहेत. दरवर्षी एटीपी-250 स्पर्धा, तसेच टाटा ओपन स्पर्धा पार पडत असलेल्या सेंटर कोर्टची क्षमता 4200 प्रेक्षकांची आहे.

यावेळी बोलताना सुंदर अय्यर म्हणाले की, पुणे हे नेहमीच देशातील टेनिसचे प्रमुख केंद्र राहिले आहे.या स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. पुण्यात पहिल्यांदाच  टेनिस प्रीमियर लीग होत असून यंदाची स्पर्धा सर्वात भव्य आणि दर्जेदार होईल. टेनिस प्रीमियर लीगसारख्या अभिनव कल्पनेसह खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेमुळे भारतातील टेनिसची लोकप्रिता निश्‍चितच उंचावणार आहे. पुण्याला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.

अय्यर यांच्याशी सहमती व्यक्त करताना अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, टेनिस प्रीमियर लीगसारख्या खास आणि क्रांतिकारक स्पर्धेसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले बालेवाडी टेनिस संकुल हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. लीगची तिकिटवि विक्री सुरू होण्याची पुणेकर टेनिसशौकीन उत्सुकतेने प्रतीक्षा करीत असून त्यासाठी हजारोंचा प्रतिसाद मिळेल आणि लीगचे सहसंस्थापक कुणाल ठक्कर आणि मृणाल जैन यांच्या परिश्रमांना पुणेकर जोरदार प्रतिसाद देतील, असा आम्हांला विश्‍वास आहे.

लीगचे सहसंस्थापक कुणाल ठाकुर यावेळी म्हणाले की, पुणे हे देशातील टेनिसचे एक प्रमुख केंद्र आहे. स्पर्धेचे यजमानपद  स्वीकारल्याबद्दल आम्ही अखिल भारतीय टेनिस संघटना,  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना यांना धन्यवाद देतो. बालेवाडीतील जागतिक दर्जाच्या टेनिस संकुलात खेळताना आंतरराष्ट्रीय खेळाडूंना निश्‍चितच आनंद आणि समाधान मिळेल, अशी आम्हांला खात्री वाटते.

लीगचे सहसंस्थापक मृणाल जैन म्हणाले की, टेनिस प्रीमियर लीगचा पुण्यात होणारा चौथा मौसम  आतार्पंतचा सर्वात भव्य आणि यशस्वी ठरेल, असा आम्हांला विश्‍वास आहे. अशी भव्य स्पर्धा आयोजित करण्यासाठी पुणे हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. पुण्यात ही स्पर्धा पहिल्यांदाच होत असून शहरातील उत्साही आणि क्रीडाप्रेमी युवक तसेच असंख्य क्रीडाप्रेमी नागरिकांमुळे लीगच्या संकल्पनेला भरघोस पाठिंबा मिळेल, यात आम्हाला शंका नाही. आतार्पंतची सर्वात भव्य टेनिस प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि आम्हाला दिलेल्या पाठिंबबद्ल आम्ही अखिल भारतीय टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना या  सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.