December 2, 2025

पुणे: राजगड-पानशेत येथे सुरक्षेसंबंधी सूचनांचे पालन करून पर्यटन सुरु

पुणे, २८ जून २०२५: भोर, राजगड व मुळशीचे सन्माननीय आमदार शंकर मांडेकर यांच्या सूचनेनुसार, २७ जून रोजी राजगड तालुक्यातील पर्यटन व्यवसायासंबंधी अडचणी जाणून घेण्यासाठी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस राजगड तालुक्याचे प्रांत अधिकारी तथा पुण्याचे उप-जिल्हाधिकारी महेशजी हरिश्चंद्रे, तहसीलदार निवासजी ढाणे, आणि उप पोलीस निरीक्षक निलेशजी खामगळ हे उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील सर्व पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते.

या चर्चेमध्ये अधिकाऱ्यांनी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व शासनाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतले. त्यानुसार, ‘रेड अलर्ट’ म्हणजेच अतिवृष्टीच्या दिवशी वगळता राजगड तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरक्षेची योग्य दक्षता घेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. रिसॉर्ट्स चालवणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच पर्यटकांनी शासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.

पानशेत भागात वर्षभरासाठी आगाऊ बुकिंग केलेले पर्यटक, जे अंमली पदार्थ किंवा दारू बाळगत नाहीत, आणि ज्यांच्याकडे कन्फर्म बुकिंग व्हाउचर आहे, अशा पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करून विनाअडथळा पर्यटन करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.