पुणे: नागरिकांच्या तक्रारीनंतर सह-पोलिस आयुक्तांनी दिले वाहतूक पोलिसांना वाहनांवरील कारवाई थांबविण्याचे आदेश

पुणे, १२ जून २०२२ : वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर वाहने अडवून दंडात्मक कारवाई आणि मोठा दंड आकारू नये, असे आदेश पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक शाखेला दिले आहेत. त्यामुळे वाहतूक नियमनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि दंडात्मक कारवाईला प्राधान्य देणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसेल.

 

वाहतूक पोलिसांकडून वाहनचालक उपस्थित असतानाही ‘नो पार्किंग’मधून वाहने उचलून बेकायदेशीर टोइंग शुल्क आकारणे, चालक पावती घेण्यास तयार असतानाही टोईंगचा आग्रह धरणे, वाहन उचलणाऱ्या तरुणांकडून थकबाकी वसूल करण्याचा आग्रह केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या प्रकारांविरोधात तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

तर गर्दीच्या वेळी चौकांमध्ये वाहतूक नियमन करण्यासठी पोलिस अधिकारी उपस्थित नसतात, मात्र काही रस्त्यांवर एकाचवेळी एकापेक्षा अधिक अधिकारी उपस्थित असतात,अशी माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बाबींची दखल घेत, सह आयुक्त कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक नियमन करावे, असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेश कर्णिक यांनी वाहतूक शाखेला दिले आहे.

या आदेशानंतर वाहतूक पोलिसांकडील सर्व ई- चलन मशिन्स वाहतूक पोलीस उपायुक्त यांच्याकडे जमा करण्यात आल्या आहेत. तसेच या आदेशानंतरही रस्त्यावरील वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यासाठी चौकावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष शाखेचे कर्मचारीही रस्त्यांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सतर्क राहावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केले आहे.

 

रस्त्यावरील कारवाईबाबत बंदीचे आदेश असले तरी,

बेशिस्त वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बेदरकारपणे वाहन चालवणे आणि धोकादायक वाहन चालवल्याप्रकरणी चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे.

 

याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले , “सध्या रस्त्यावरील रहदारी वाढली आहे. सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतूक नियमनाला प्राधान्य दिले जाईल.”