पुणे: अंधश्रद्धेच्या विरोधात ध्वनीचित्रफित प्रसारित केल्याने महिलेला चपलांचा हार, तृतीयपंथीयासह अकरा महिलांच्या विरोधात गुन्हा

विश्रांतवाडी, १०/०७/२०२२: अंधश्रद्धा पसरवत असल्याचे वृत्त समाजमाध्यमावरुन प्रसारित केल्याच्या रागातून एका महिलेस तृतीयपंथीय आणि त्याच्या बरोबर असलेल्या महिलांनी मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी (चॅनेल) चालविणाऱ्या महिलेला चपलांचा हार घालण्यात आला. या प्रकरणी तृतीयपंथीयासह अकरा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी सागर पोपट शिंदे उर्फ शिवलक्ष्मी संजय झाल्टे, मोहिनी हजारे, अनुजा लोहार (रा. इचलकरंजी), अश्विनी जाधव (औरंगाबाद), संजीवनी राणे (रा. कोल्हापूर) यांच्यासह पाच महिला आणि एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी चालविणाऱ्या एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ती मूळची बारामतीची आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

तक्रारदार महिला समाजमाध्यमावर वृत्तवाहिनी चालवित आहे. समाजातील अपप्रवृत्ती तसेच अंधश्रद्धेच्या विरोधात तिने वृत्त प्रसारित केले जाते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी सागर उर्फ शिवलक्ष्मी सुद्धा एक चॅनेल चालवित आहेत. त्याने अंधश्रद्धा पसरविण्यासाठी ध्वनीचित्रफित प्रसारित केली होती. हा प्रकार तक्रारदार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने सागर अंधश्रद्धा पसरवित असल्याची ध्वनीचित्रफित प्रसारित केली होती. त्यानंतर सागरने तक्रारदार महिलेशी वाद घातला होता. तक्रारदार महिलेने आरोपी सागरची माफी मागितली होती.
त्यानंतर पुन्हा माफी मागण्यासाठी आरोपीने महिलेला विश्रांतवाडीतील चौधरीनगर भागात बोलावून घेतले. तेथील एका इमारतीच्या छतावर महिलेला डांबून ठेवले. तिला मारहाण करुन तिच्या गळ्यात चपलांचा हार घालण्यात आला. महिलेला मारहाण तसेच चपलांचा हार घातल्याची ध्वनीचित्रफित सागरने प्रसारित केली होती.

 

आरोपी सागर उर्फ शिवलक्ष्मी तृतीयपंथीय आहे. तो समाजमाध्यमावर एक चॅनेल चालवित आहे. तक्रारदार महिलेला चपलांचा हार घालण्यात आला तसेच ती माफी मागत असल्याची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली होती. या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्यानंतर मारहाण करणे, बदनामी करणे तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी सांगितले.