पुणे: येरवड्यातील तारकेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी !!

पुणे, ०७/११/२०२२: आज दि.७ नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येरवडा येथील तारकेश्वर मंदिरामध्ये समस्त हिंदू आघाडी, येरवडा विभागातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचा परिसर सहस्त्र दिव्यांनी उजळून निघाला होता. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, शीख, जैन व आदी भारतीय संस्कृतीचे प्रवाह असलेल्या पंथांनी मंदिर परिसरात दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली. तसेच छ. शिवाजी महाराज, तथागत भगवान बुद्ध, श्री गुरुनानक साहिब, भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. एकाच कार्यक्रमात विविध पंथ, पक्ष, संघटना, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले असा हा दुर्मिळ योग होता. बौद्ध पंथाचे धर्मगुरू श्री. हर्षवर्धन शाख्य भंते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामुळे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचा मोठा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला गेला.
  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त “दीपोत्सव सोहळ्याचे” समस्त हिंदू आघाडी व श्री. शिवसमर्थ गोशाला फौंडेशनचे हे २२ वे वर्ष आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नगरसेवक शंकरशेठ चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम हे होते तसेच  कार्यक्रमाची व्यवस्था व आयोजनासाठी भूषण जाधव, संतोष गायकवाड,  विनोद वाल्हेकर, सूत्रसंचालन कौस्तुभ कापडणी, दिनेश पवार, साई कोटेलू यांनी विशेष मेहनत घेतली.