पुणे: सातववाडीत डंपरच्या धडकेत बाप लेकीचा जागीच मृत्यू

useपुणे, १९/०७/२०२२: मुलीला शाळेत सोडविण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वाराला डंपर चालकाने धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात वडिलांसह मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सासवड रस्त्यावरील सातववाडीत ग्लायडिंग सेंटरनजीक घडली.

नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) आणि मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात ठार झालेल्या बाप-लेकीची नावे आहेत. याप्रकरणी डंपरचालक दिलीप कुमार पटेल (रेवा, मध्यप्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

मीनाक्षी साळुंखे साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नीलेश तिला शाळेत सोडविण्यासाठी फुरसुंगीहून दुचाकीवर हडपसरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी सातववाडी परिसरात पाठीमागून आलेल्या डंपर चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नीलेशचा डंपर चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीला धक्का बसल्याने बाजूला पडलेल्या मीनाक्षीला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मीनाक्षीचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी दिलीप पटेल (रेवा, मध्यप्रदेश) याला हडपसर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.