पुणे : खंडणी मागणाऱ्या दोन वेबपोर्टल पत्रकारांना अटक

पुणे, १८ जुलै २०२१: – शहरातील एका परमिटरूममध्ये जाऊन ‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून एक हजार रूपये घेऊन पुन्हा पाच हजारांची खंडणी मागणाऱ्या महिलेसह दोघा कथित पत्रकारांना खडक पोलिसांनी काल दुपारी अटक केली. सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय ५७, रा. वाघोली) आणि त्याच्या साथीदार महिलेला अटक करण्यात आली.


शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हृज चौकातील एक परमिट रूममध्ये हा प्रकार घडला. काल दुपारी क्राईम चेक टाईमचे ओळखपत्र गळ्यात घालून बग्गासह महिला त्यांच्या परमिटरूममध्ये गेले. “तुम्ही अवैधरित्या दारूची विक्री करीत आहात, लोेकांना परमिटरूममध्ये बसवून दारू विक्री करीत आहात. प्रकरण मिटवायचे असल्यास एक हजार रूपये द्या,” अशी मागणी करून त्यांनी रक्कम स्वीकारली. त्यानंतर आरोपींनी परमिटरूम मालकाला फोन करून पुन्हा पाच हजारांची खंडणी मागितली. त्यानंतर परमिट रूम मालकाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपीना अटक केली. याप्रकरणी संबंधित आरोपींकडील ओळखपत्रे आणि त्यांच्या वेबपोर्टलसंदर्भात माहिती घेण्यात येत आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.