पुणे: सिव्हील सर्जनसह दोन वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे, ०७/०७/२०२२: औंध ग्रामीण रुग्णालयाच्या सिव्हील सर्जनसह तीन अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणात अटक केली आहे. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सोनोग्राफी सेंटरचे प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवाना देण्यासाठी त्यांनी चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणीकरून १२ हजार रुपयांची लाच घेतली.

सिव्हील सर्जन डॉ. माधव बापूराव कनकवळे (वय ५०), तसेच प्रशासकीय अधिकारी महादेव बाजीराव गिरी (वय ५२) आणि लिपीक संवर्गमधील क्लर्क संजय सिताराम कडाळे (वय ४५) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

डॉ. माधव कनकवळे हे औंध छावणी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक (सिव्हील सर्जन) आहेत. तर महादेव गिरी हे प्रशासकीय अधिकारी आहेत. तसेच, संजय कडाळे हे क्लर्क आहेत. दरम्यान, यातील २५ वर्षीय तक्रारदार यांचे शिक्रापूर येथे सोने ग्राफी सेंटर आहे. या सोनोग्राफी सेंटरचा परवाना नूतकीकरण करायचे होते. त्यासाठी त्यांनी औंध छावणी रुग्णालयात प्रमाणपत्राचे नूतनीकरण परवानासाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक संजय कडाळे यानी लोकसेवक डॉ. माधव कणकवळे व लोकसेवक महादेव गिरी यांच्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदारांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार, गुरूवारी दुपारी रुग्णालयाच्या परिसरात सापळा कारवाई करण्यात आली. त्यात कडाळे यांना तडजोडीअंती १२ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. दरम्यान कारवाईनंतर एसीबीकडून त्यांच्याकडे तपास केली जात असून, घराची झडती देखील घेतली जात आहे.