पुणे: वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

पुणे, १८/१२/२०२२: शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा आणि पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.

कोंढव्यातील खडीमशीन चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ओंकार गौतम वाघमारे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुमीत म्हस्के (वय २०, रा. बिबवेवाडी) जखमी झाला. म्हस्के याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार म्हस्के आणि त्याचा मित्र वाघमारे कोंढवा-कात्रज रस्त्यावरील खडीमशीन चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी वाघमारेचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी दिनेश रासकर तपास करत आहेत.

दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावर उरूळी कांचन परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेने मालवाहू गाडीचालक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अविनाश शिवाजी बागाडे (वय १९, रा. माकर वस्ती, सहजपूर, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. शिवाजी बागडे (वय ४८) यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश बगाडे आणि त्याचे दोन मित्र हिंजवडीत माल घेऊन गेले होते. तेथून मालवाहू गाडीतून ते सहजपूरकडे निघाले होते. उरुळी कांचन परिसरात पहाटे तीनच्या सुमारास ते थांबले. मालवाहू गाडी रस्त्याच्या कडेला लावली. मालवाहू गाडीचा दरवाजा उघडून अविनाश प्रवेश करत होता. त्या वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने गाडीला धडक दिली. अपघातात अविनाशचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून पोलस उपनिरीक्षक घायगुडे तपास करत आहेत.