पुणे, ३ जून २०२५ :रविवारी (दि. १) नाना पेठेतील इनामदार चौकात एका फलकास स्पर्श झाल्याने लहान मुलीचा मृत्यू झाल्यानंतर, त्या फलकाला अनधिकृतपणे वीज जोडण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिकेने याची पुष्टी करत शहरातील सर्व अनधिकृत फलकांवर आणि बेकायदेशीर वीज जोडांवर तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.
घटनास्थळी असलेला फलक माजी नगरसेवक स्वर्गीय उदयकांत आंदेकर यांच्या स्मरणार्थ लावण्यात आलेला होता. या फलकास विद्युत पोलपासून साधारण पाच ते सात फूट लांबीचा वायर जोडण्यात आला होता. पालिकेच्या प्राथमिक तपासणीत हा फलक व त्याला जोडलेली वीज लाईन अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सुरुवातीला पालिकेने संबंधित खांब महावितरणचा नसल्याचे सांगितले होते. मात्र, घटनेची चौकशी करताच विद्युत जोड बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी सांगितले की, “शॉक लागून एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही शहरातील अनधिकृत विद्युत जोड व फलकांवर कारवाई सुरू करत आहोत. यासाठी वॉर्ड स्तरावर कनिष्ठ अभियंत्यांना आदेश दिले गेले आहेत. कारवाई मंगळवारपासून सुरू होणार आहे.”
अशी होणार कारवाई :
– सर्वप्रथम मुख्य फिडरची लाईन बंद केली जाईल
– अनधिकृत वीज जोडांची तपासणी व नोंद केली जाईल
– संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाईल
– वॉर्ड ऑफिस स्तरावर ही मोहीम राबवली जाणार आहे
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फलक लावून त्यास थेट विद्युत पोलवरून वीज जोडली जाते, ही व्यवस्था जीवघेणी ठरू शकते याचे ज्वलंत उदाहरण या दुर्घटनेतून समोर आले आहे. आता महापालिकेने जाग येत तातडीने कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार