पुणे विद्यापीठाच्या कारभार्यांना दणका; रानडे इन्स्टिट्युट’च्या स्थलांतरणाचा निर्णय रद्द

पुणे, १४/०८/२०२१ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कारभार्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चांगलाच दणका दिला. फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्युटमधील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या एकत्रीकरण आणि हस्तातंरणाचा निर्णय रद्द करायला लावलाच शिवाय कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना तातडीने आदेश काढावा लागला.


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाला (रानडे इन्स्टिट्युट) शनिवारी भेट दिली. त्यानंतर विद्यापीठाने निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.


यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे, उपाध्यक्ष सुदीप डांगे, पुणे श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर आदी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संज्ञापन व पत्रकारिता विभाग आणि माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग या दोन्ही विभागांच्या एकत्रीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र रानडे इन्स्टिट्युट विद्यापीठात स्थलांतरीत करण्याच्या वादानंतर अखेर दोन्ही विभागांच्या एकत्रिकरणास विद्यापीठाने शुक्रवारी स्थगिती दिली होती. आता शनिवारी अखेर हा निर्णय रद्द करण्यात आला.