पुणे: आई, वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा

पुणे, २६/०६/२०२१: कोरोनाच्या काळात घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याचीच दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांचे माता किंवा पित्याचे छत्र कोरोनामुळे हरवले आहे, अशा विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचे व यंदाचे परीक्षा शुल्क पूर्ण माफ केला करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदापासून विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांकडून शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतलेला असताना त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

पुणे विद्यापीठाची आज (शनिवारी) व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. त्यामध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत, त्यामध्ये कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आई, वडील कोरोनामुळे गमावले आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफ करावे असा प्रस्ताव व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे यांनी मांडला. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे.

विद्यापीठाने एकीकडे या विद्यार्थ्यांना दिलासा दिला असला तरी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या शुल्कवाढ स्थगितीच्या मुद्द्यावर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच चर्चा झालेली नाही. पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांचे शुल्कवाढ केली आहे, पण गेल्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने त्यास एका वर्षासाठी स्थगिती दिली.