दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डिजिटल लॅबोरेटरीचे उद्घाटन

पुणे,दि.१८/०४/२०२२: दिव्यांग अभ्यास व सर्वसमावेशक केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग व युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विद्यापीठात डिजिटल लॅबोरेटरी व सहायक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठीच्या नवीन सुविधांचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी सी.ए शिल्पा भिडे, शिक्षणशास्त्र प्रशालेचे संचालक प्रा. संजीव सोनवणे, विभागाच्या प्रमुख प्रा.मेघा उपलाने, युथ फॉर जॉब फाऊंडेशनचे वरीष्ठ प्रबंधक रमेश दुरईकन्नन, समीर नायर, कॅपजेमीनी सीएसआर इंडियाच्या ऑपरेशन प्रमुख धनश्री पागे आदी यावेळी उपस्थित होते.

युथ फॉर जॉब फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून कॅपजेमीनी सीएसआर यांनी २५ आधुनिक संगणक, एक एलसीडी प्रोजेक्टर, प्रिंटर, लॅपटॉप अशा सुविधा केंद्रास उपलब्ध करून दिल्या. याव्यतिरिक्त दोन संगणक प्रशिक्षक, एक सॉफ्ट स्किल प्रशिक्षक एक प्रशासकीय कर्मचारीसुद्धा तीन वर्षासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

या सुविधांचा उपयोग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी आवश्यक असलेले माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे पदविका अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रा.संजीव सोनवणे यांनी दिली.