पुणे विद्यापीठ: दुसऱ्या सत्राची परीक्षा जून मध्ये

पुणे, दि. 15 मे २०२१: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत पदवी आणि पदव्युत्तरच्या दुसर्‍या सत्राच्या परीक्षा पुढच्या महिन्यात म्हणजेच 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असल्याचा निर्णय शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. त्यात दुसर्‍या सत्रातील परीक्षा घेण्यावर चर्चा झाली. त्यानंतर ह्या परीक्षा 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने घेण्यावर एकमत झाले. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्याची रूपरेषा परीक्षा विभागाकडून प्रसिद्ध केले जाणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच करोनाचा प्रादुर्भावामुळे महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महिन्यात होणारी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा करेानामुळे एप्रिल महिन्यापासून घेण्यात येत आहे. ही परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने योग्य पद्धतीने घेतली. यामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीविना परीक्षा देता आली. ही परीक्षा ऑनलाइन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्यात विद्यापीठाला यश आले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन  पद्धतीने घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण महाविद्यालयाकडून प्राप्त झाल्याशिवाय निकाल जाहीर करता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी दि. 15 जूनपर्यंत प्रात्यक्षिकेची परीक्षा घ्यावी. त्याचे गुण दि. 25 जूनपर्यंत विद्यापीठाकडे सादर करावेत, असाही निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.