सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्रवाशी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणास सुरुवात

पुणे, १६ /०८/२०२१: पुणे शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळख असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ  लिमिटेड (पीएमपीएमएल) केंद्र शासनाची “ट्रान्सपोर्ट फॉर ऑल” ही संकल्पना प्रभावीपणे राबवणार आहे. यासाठी पीएमपीएमएल व शिक्षणक्षेत्रात नामांकित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात पीएमपीएमएलचे सशक्तीकरण करणेकामी दि.३० जुलै २०२१ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारान्वये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून दिनांक १६ ऑगस्ट २०२१ पासून सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

“ट्रान्सपोर्ट फॉर ऑल” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशी नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अडीअडचणी, त्यांचे अभिप्राय व त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून प्रश्नावली तयार करण्यात आली असून या प्रश्नावलीच्या आधारे सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध विभागांमार्फत अभ्यास करून सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. सर्वेक्षणातून पुढे येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यापीठ व पीएमपीएमएल एकत्रितपणे
प्रयत्न करणार आहे. तरी या सर्वेक्षणास महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व तरुणाईने भरघोस प्रतिसाद देऊन त्यांच्या समस्या सांगाव्यात व आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.