अखिल भारतीय कुलगुरू चषक स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठाचा संघ हरियाणाला रवाना

पुणे, ३१/१०/२०२२- अठराव्या अखिल भारतीय कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रिकेट संघ हरियाणाला रवाना झाला आहे. या संघाला जाण्यापूर्वी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ.संजय ढोले, सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश असलेला १५ जणांचा संघ हरियाणा ला गेला आहे. देशभरातील २८ विद्यापीठाचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून ही स्पर्धा ३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत हिस्सार, हरियाणा येथे होणार आहे. विद्यापीठाच्या संघाची निवड महाराष्ट्र क्रिकेट असोसएशनमधील कोच नितीन सामल यांनी केली आहे. विद्यापीठाच्या संघात मनीष गायकवाड(कर्णधार), सुनील मते, बसवंत गजलवार, शंतनु काशीद, शांताराम गोजगे, दीपक गजरमल, विनोद नरके, संतोष सुगावे, सुशांत बुलबुले, बालाजी कुंभार, नितीन प्रसाद, दिनेश वाल्मिकी, अक्षय वाल्मिकी, संतोष माहुलकर व मोहन बेलेकर (संघ व्यवस्थापक) यांचा सामावेश आहे. विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने यांनी संघाला मार्गदर्शन केले.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांप्रमाणे येथील कर्मचारी देखील सातत्याने खेळात भाग घेत विद्यापीठाचे नाव पुढे नेतात ही अभिमानाची बाब आहे. सर्वच प्रकारच्या खेळांना विद्यापीठाकडून कायमच प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असतो – डॉ.संजीव सोनवणे, प्र.कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ