विद्यापीठात लवकरच ‘स्पोकन संस्कृत’ अभ्यासक्रम

पुणे,दि.८- स्पोकन इंग्लिश, स्पोकन मराठी यांच्यासारखे अभ्यासक्रम (कोर्सेस) आपण ऐकले असतील पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच स्पोकन संस्कृत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. संस्कृत विषयाची गोडी लागावी व त्यामध्ये संवाद वाढवा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत विषयात लवकरच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री सद्गुरू ग्रुप यांच्यात ८ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, संस्कृत व प्राकृत विभागाचे प्रमुख प्रा.देवनाथ त्रिपाठी, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, डॉ. रविंद्र मुळे, श्री सद्गुरू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, अतुल भगरे, भारत जगताप, घाटे गुरुजीआदी यावेळी उपस्थित होते.

यशवंत कुलकर्णी म्हणाले, आठशे पौरोहित्य करणारे गुरुजी आमच्या संस्थेशी संलग्न आहेत. यातील जवळपास सर्वच जण संस्कृत विषयक अभ्यास करण्यास व संस्कृत भाषा बोलण्यास इच्छुक आहेत. यांना पूर्णवेळ अभ्यास करणे शक्य नाही म्हणूनच या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हे संस्कृत भाषा शिकण्यास इच्छुक आहेत.

कोट
आपल्याकडे संस्कृत विषयाचे पूर्णवेळाचे अभ्यासक्रम आहेत, मात्र आपले काम सांभाळून प्रत्येकालाच पूर्ण वेळाचे संस्कृत विषयाचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. म्हणून आपण हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करत आहोत. यामुळे संस्कृत विषयाची गोडी वाटून त्यात संवाद वाढेल.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

अभ्यासक्रमाविषयी माहीती
नाव – सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन संस्कृत
कालावधी- ३० तास
स्वरूप- ऑनलाईन/ऑफलाईन
विद्यार्थी क्षमता- ५०
अधिक माहिती- www.unipune.ac.in