पुणे: विद्यापीठांना शुल्क कमी करण्यास सांगणार, उदय सामंत करणार कुलगुरूंशी चर्चा

पुणे, २७/०६/२०२१: गेल्यावर्षीपासून विद्यार्थी शुल्क कपात करण्याची मागणी करत असले तरी, यंदा त्यास यश येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विद्यापीठांनी शुल्क कपात करावी यासंदर्भात सर्व विद्यापीठांच्या कुलगरूंशी चर्चा करून त्यासंदर्भात सूचना करणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय,प्रयोगशाळा, क्रिडांगण यासह इतर शुल्क कमी करावे अशी मागणी केली जात होती. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २०२१-२२च्या शुल्कात २५ टक्के कपात केली आहे. मात्र, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याने या विद्यार्थ्यांवर दुजाभाव होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात होता. त्याबाबत उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकर दिले.

सामंत म्हणाले, ‘‘व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या खासगी महाविद्यालयांचे शुल्क शुल्क नियंत्रण प्राधिकरणाकडून (एफआरए) निश्‍चीत केले जाते, त्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. पण विद्यार्थ्यांची व पालकांची शुल्क कमी करण्याची मागणी आहे. गेले काही महिने ‘एफआरए’ची समिती कार्यरत नव्हती, पण नुकतीच नवीन गठीत झाली आहे, या समितीच्या अध्यक्षांकडून विद्यार्थी, पालक व संस्था यांच्याशी चर्चा करून शुल्ककपाती बाबात सुवर्णमध्य काढला जाईल, तसेच एफआरएकडून राज्य सरकार शुल्क कपातीबाबत प्रस्ताव मागवला जाईल.

नागपूर विद्यापीठाने संलग्न महाविद्यालायांचे शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच प्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह सर्व अकृषी विद्यापीठांनी निर्णय घेतला पाहिजे. सोमवारी सर्व कुलगुरूंसोबत बैठक होणार आहे, त्यांच्याशी चर्चा करून शुल्क कपातीबाबत सूचना केली जाईल. मात्र, विद्यापीठे हे स्वायत्त असल्याने त्यांच्यवर शुल्क कपातीबाबत दवाब टाकू शकणार नाही, असे सामंत यांनी स्प्ष्ट केले.