पुणे: शहरात २० हजार जणांचे लसीकरण

पुणे, २/०६/२०२१: शहरात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम मंदावलेली असताना खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. आज (बुधवारी ) शहरात २० हजार ३०१ जणांचे लसीकरण झाले असून, त्यामध्ये त्यातही १८ ते ४४ या वयोगटातील तरुणांनी १८ हजार ६०० लस घेतली.

महापालिकेकडे शिल्लक असलेली कोव्हीशील्ड परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वापरली जात आहे. तर कोव्हॅक्सीनचे डोसही खूप कमी आहे. त्यामुळे रोज केवळ पंधराशे जणांचे लसीकरण केले जात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण मोठ्याप्रमाणात होत आहे. अनेक कंपन्यांनी खासगी रुग्णालयाशी करार करून थेट कामाच्या ठिकाणी किंवा रुग्णालयात लसीकरण सुरू केले आहे. त्याबाबत महापालिकेकडून मान्यता ही घेण्यात आली आहे.

आज शहरात एकूण २० हजार ३०१ जणांचे लसीकरण झाले आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी २४ हजार जणांचे लसीकरण झाले होते, त्यानंतर आज प्रथमच २० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये ३३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला, फ्रंटलाईनच्या १३३ कर्मचाऱ्यांनी पहिला तर १३ जणांनी दुसरा डोस घेतला. ३०५ ज्येष्ठ नागरिकांनी पहिला तर १५९ जणांनी दुसरा डोस घेतला. ४५ ते ५९ वयोगटातील ८१७ जणांनी पहिला तर १७१ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ ते ४४ वयोगटात १७ हजार ५६४ जणांनी पहिला डोस घेतला तर १ हजार १०६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.