पुणे: लसीकरण फक्त दुसऱ्या डोसचे, पहिला डोस स्थगित; कोव्हॅक्सीनचे डोस संपले

पुणे, ता. १२ मे २०२१: लसीचा अपुरा पुरवठा आणि दुसऱ्या डोससाठी पात्र झालेल्या नागरिकांची जास्त संख्या यामुळे पुणे महापालिकेने उद्यापासून (गुरुवार) शहरात १८ ते ४४ आणि ४५ च्या पुढील गटासाठीचे पहिल्या डोसचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवस केवळ ४५ च्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठीच लस राखीव असणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे, त्यामुळे नागरिकांकडून लसीकरण करून घेण्यास प्रतिसाद वाढत असला तरी मागणीच्या प्रमाणात शहरात येणारा लसीचा पुरवठा खूप कमी आहे. त्यातच १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण सुरू झाले असल्याने सर्वांना लस उपलब्ध करून देताना महापालिकेची तारेवरची कसरत होत आहे. त्यातून वाद, आरोप प्रत्यारोप व राजकारण सुरू झाले आहे.

शहरात कोव्हीशील्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी सुमारे ४ लाख, तर कोव्हॅक्सीन दुसऱ्या डोससाठी सुमारे ५० हजार नागरिक पात्र आहेत. सध्या राज्य व केंद्र शासनाकडून कोव्हॅक्सीनपेक्षा कोव्हीशील्ड लसीचा पुरवठा जास्त केला जात आहे. सध्या महापालिकेकडे कोव्हॅक्सीन लसीचा एकही डोस उपलब्ध नसल्याने या लसीचा दुसरा डोस देणे देखील अशक्य झाले आहे. तर कोव्हीशील्डचे २८ हजार डोस उपलब्ध झाले असून, त्याचा वापर आता दुसऱ्या डोससाठी केला जाणार आहे.

११९ ठिकाणी होणार लसीकरण

महापालिकेला मंगळवारी २८ हजार कोव्हीशील्डचे डोस मिळाले होते. त्याद्वारे शहरातील ११२ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. गुरुवारी ४५ च्या पुढील वयोगटासाठी केवळ दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यासाठी ११९ केंद्र निश्‍चीत करण्यात आले आहेत. या प्रत्येक केंद्रावर कोव्हीशील्डचे १०० डोस पुरविण्यात आले आहेत. ज्या नागरिकांनी २९ मार्च रोजी पहिला डोस घेतला आहे अशाच नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘‘उद्यापासून १८ ते ४४ आणि ४५च्या पुढील वयोगटाचे पहिल्या डोसचे लसीकरण पुढील काही काळ बंद असले. शासनाकडून येणारी लस प्राधान्याने दुसऱ्या डोससाठी वापरली जाईल. सध्या कोव्हॅक्सीनचे डोस पालिकेकडे उपलब्ध नाहीत, ते आल्यानंतर वितरणाबाबत नियोजन केले जाईल.’’ -रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त