पुणे: लसीकरण फक्त ५० ठिकाणी, प्रामुख्याने उपनगरांमध्ये लसीकरण

पुणे, 10 मे 2021:  केंद्र व राज्य शासनाकडून नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने उद्या (मंगळवारी) फक्त ५० केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. यातील बहुतांश केंद्र उपनगरांमधील आहेत. यातील ४० केंद्रांवर कोव्हीशील्ड तर १० केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस मिळणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या डोससाठीच्या नागरिकांना लस दिली जाणार आहे.

रविवारी महापालिकेला शासनाकडून २६ हजार लसीचे डोस मिळाले होते. त्यानुसार सोमवारी शहरात १११ ठिकाणी लसीकरण करण्यात आले आहे. पण मंगळवारी लस उपलब्ध झालेली नाही. महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सुमारे साडे तीन हजार डोसचे नियोजन करून मंगळवारच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे.

शहरातील ३५ केंद्रांवर कोव्हीशील्डची लस दिली जाणार आहे. याठिकाणी प्रत्येक केंद्रावर १०० डोस देण्यात आले आहेत. या लसीमधील २० टक्के लस ही ज्यांनी पहिल्या डोससाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे अशांसाठी उपलब्ध असणार आहे. तर इतर पाच ठिकाणे हे पोलिस व लष्करी आस्थापनांच्या आवारात आहेत. त्या ठिकाणी ५०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या १० ठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीन
कोव्हॅन्सीची लस कमला नेहरू रुग्णालय मंगळवार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय डायस प्लॉट, मालती काची दवाखाना, सावित्रीबाई फुले दवाखाना कोंढवा, छत्रपती शाहू दवाखाना केदारीनगर, भानगिरे दवाखाना हडपसर, बिंदू माधव ठाकरे दवाखाना वारजे, औंध कुटी दवाखाना औंध, संत रामदास शाळा शिवाजीनगर, गलांडे रुग्णालय नगर रस्ता या १० ठिकाणी उपलब्ध केली आहे.

कोणाला मिळणार लस
कोव्हीशील्ड – २७ मार्च पूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस व पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध
कोव्हॅक्सीन – ज्यांनी १३ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार

१८ ते ४४ साठी दोन केंद्र
१८ ते ४४ वयोगटासाठीच्या केंद्रांची संख्या ६ वरून कमी करून २ केली आहे. यामध्ये कमला नेहरू रुग्णालयात ५०० डोस आणि राजीव गांधी रुग्णालयासाठी ५०० डोस उपलब्ध केले आहेत. आॅनलाइन बुकिंग केलेल्यांनाच ही लस मिळणार आहे.