पुणे, २८ मे २०२५: वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबातील पाच जणांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर सासरे राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात पाचही आरोपींना हजर करण्यात आलं असता न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कोठडीत कोणताही त्रास झाला का, हे विचारले. त्यावर सर्व आरोपींनी ‘नाही’ असे उत्तर दिले.
सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले की, आरोपींचे मोबाईल अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. फरार असलेला निलेश चव्हाण कुठे आहे, याचा तपास करायचा आहे. मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग असण्याची शक्यता आहे. तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले ५१ तोळे सोने गहाण ठेवले असून त्याची माहिती घ्यायची आहे. याशिवाय, मारहाणीमध्ये वापरलेली हत्यारे आणि रॉड हस्तगत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आरोपींच्या वतीने वकिल नितीन अडगळे यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत युक्तिवाद केला. “गहाण ठेवलेले सोने कोणत्या बँकेत आहे, याची माहिती आधीच देण्यात आली आहे. निलेश चव्हाण या प्रकरणात आरोपी नसावा, कारण त्याने फक्त बाळाची काळजी घेतली. त्याने जर गुन्हा केला असेल, तर फाशी द्या, पण त्याला जबरदस्तीने आरोपी ठरवू नये,” असे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे, युक्तिवादादरम्यान अडगळे यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरही संशय व्यक्त केला. “तीचा एका अनोळखी व्यक्तीसोबत चॅट सुरु होता. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्या आधारे आम्हाला न्याय हवा आहे,” असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
पुढे बोलताना, त्यांनी असा दावा केला की, “वैष्णवीला आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. तीने पूर्वी रॅट पॉइझन घेतले होते आणि एकदा गाडीमधून उडी मारण्याचाही प्रयत्न केला होता. एखाद्या नवऱ्याने कानाखाली मारणे म्हणजे हॅरेसमेंट ठरत नाही. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, आम्हाला फॉर्चुनरसाठी कुणाला त्रास देण्याची गरज नाही,” असा दावा करत त्यांनी पोलीस कोठडीला विरोध केला.
या प्रकरणामुळे वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले असून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.
More Stories
महापालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम; ५००० चौ.फुट बांधकाम जमीनदोस्त
Pune: प्रभाग रचनेवरून सुनावणीमध्ये गोंधळ
चांदणी चौक ते जांभुळ वाडी, जैन वसतिगृह बकोरी फाटा ते बकोरी या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल महिनाभरात तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार