पुणे, १८ सप्टेंबर २०२५: पुणे महापालिकेने आयूक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली आहे. गुरुवारी देखील भर पावसात औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय तसेच धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कात्रज परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. तर ढोले पाटील रस्ता, कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दोन दिवसांत अतिक्रमणे व बांधकामे पाडण्यात आली.
शहरातील विविध भागात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामा विरोधात महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण व बांधकाम विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार गुरुवारी औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन (दुतर्फा), डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते भाऊ पाटील रस्ता हॅरिस ब्रीज इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. या कारवाईत फ्रंट मार्जिन,साईड मार्जिन तसेच अनधिकृतपणे उभारलेले कच्चे बांधकाम, हॉटेल, दुकाने,कच्चे पक्के शेड अशा जवळपास ९८ अनधिकृत शेड पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण उपायुक्त संदीप खलाटे व सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता कामिनी घोलप, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक राहुल बोकन,सहायक अतिक्रमण निरीक्षक वैभव जगताप,राहुल डोके, हाशम पटेल, पंकज आवाड यांची पथकाने केली. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व घोले रस्ता शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभागाने देखील या कारवाईसाठी मदत केली. कर्मचाऱ्यांनी तंबू,लोखंडी जाळ्या,फ्रीज,काउंटर,लोखंडी मांडणी,टेबल,फर्निचर ,लोखंडी कॉट असे तीन ट्रक साहित्य जप्त करत ६७,३६५ चौरस फूट क्षेत्र रिकामा केला.
धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कात्रज चौक परिसरातही संदीप खलाटे यांच्यासह, परिमंडळ उपायुक्त विजयकुमार थोरात तसेच सहाय्यक आयुक्त धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय सुरेखा भणगे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता विक्रांत क्षीरसागर, अतिक्रमण निरीक्षक सागर विभूते, तसेच सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई करत २५०० चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. या कारवाईत पाच ट्रक साहित्य जप्त केले गेले. मंगळवार व बुधवारी सार्वजनिक रस्ते पदपथावरील तब्बल ३१ हजार ७०० चौरस फूट अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली. यात १३ हातगाडी, ४१ पथारी, १० सिलिंडर, ८८ झोपड्या, इतर ८३ यावर कारवाई करण्यात आली.
More Stories
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन
Pune: संशोधक विद्यार्थ्यांची ही अवस्था तर बाकीच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच काय?
Pune: एकीकडे खड्डेमुक्तीचा दावा; दुसरीकडे ५५० किमीची खोदाई