पुणे: विकास ढाकणे यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

पुणे, 03 डिसेंबर 2022: विकास ढाकणे यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते सिव्हिल सर्व्हिसेसचे 2008 बॅचचे अधिकारी आहेत. नगरविकास विषयात प्रस्तावित पीएचडी व्यतिरिक्त त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), बी.एसी. (कृषी), आणि एल. एल. बी. पदवी प्राप्त केली आहे.

या अगोदर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.

 ढाकणे यांना विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या सेवेत त्यांनी भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आणि रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, पुणे, सोलापूर विभागांवर सहायक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे.

त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, त्यांना 2014, 2018 आणि 2019 मध्ये केंद्रीय मंत्रालयाचा पुरस्कार आणि 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राजपथ, दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये त्यांनी परेड कमांडरचा सन्मान पटकावला आहे. त्यांच्या बॅचचे सर्वोत्कृष्ट प्रोबॅशनरी अधिकारी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

वाचन, ट्रेकिंग आणि दिग्दर्शन ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले आहे.

त्यांच्या पिंपरी चिंचवड येथील कार्यकाळात महानगरपालिकेने १५ हून आधिक सन्मान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पटकावलेले आहेत.