September 21, 2025

पुणे: विशाल नगर-पिंपळे निलख रहिवासी मंचची स्थापना; नागरी समस्यांवर सामूहिक उपाययोजना करण्याचा निर्धार

पिंपरी चिंचवड, ८ जुलै २०२५: विशाल नगर डीपी रोड परिसरातील विविध सोसायट्यांचे रहिवासी एकत्र येत, “विशाल नगर-पिंपळे निलख रहिवासी मंच” या नव्या मंचाची स्थापना दिनांक ६ जुलै रोजी करण्यात आली. या मंचाच्या माध्यमातून परिसरातील वाहतूक अडचणी, पादचारी मार्गांवरील अतिक्रमण, सार्वजनिक सुरक्षेच्या समस्या तसेच नागरी सुविधांशी संबंधित तक्रारी यावर सामूहिक व समन्वयित कृतीद्वारे उपाय शोधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून, स्थानिक प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याचे माध्यम म्हणून काम करणार आहे. “आपला परिसर ही आपलीच जबाबदारी” या भावनेतून प्रेरित होत, रहिवाशांनी एकत्र येऊन नागरी प्रश्नांसाठी एकसंध आणि ठोस आवाज उभारण्याचा संकल्प केला आहे.

या उपक्रमात वॉटर एज, शुभेच्छा रेसिडेन्सी, ओव्हल स्प्रिंग, २४के ग्लिटराटी, यशदा एपिक, एनएसजी रॉयल, २४के ओपुला, श्रीराम, नंदनवन, निसर्ग आकाश आणि नेको स्काय पार्क या सोसायट्यांचे प्रतिनिधी सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

या मंचाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, परिसरातील अधिकाधिक सोसायट्यांनी व नागरिकांनी या उपक्रमात सामील व्हावे, जेणेकरून नागरी सुविधांबाबत योग्य त्या मागण्यांसाठी प्रशासनावर एकत्रित आणि सकारात्मक दबाव निर्माण करता येईल.