पुणे: एटीएम कार्डची अदलाबदली करून २४ नागरिकांची केली फसवणूक, २ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त

पुणे,०१/०७/२०२१: राज्यासह परराज्यात हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून २४ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत एटीएमचोराला वानवडी पोलिसांनी बेड्या घातल्या. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून २ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यापुर्वी त्याच्याविरूद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात ११ गुन्हे दाखल आहेत. श्रवण सतीश मिनजगी (वय २५, रा. लोणीकाळभोर, मूळ-दक्षिण सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढत असताना पत्नीचा फोन आल्यामुळे बाहेर गेल्यानंतर चोरट्याने जेष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड ताब्यात घेउन फसवणूकीची घटना वानवडी परिसरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४० सीसीटीव्हींचे पुâटेज तपासून लोणी काळभोर पसिररातील कदम वाक वस्तीचा परिसर शोधून काढला. दरम्यान, फसवणूक करणारा चोरटा लोणी काळभोरमध्ये असल्याची माहिती संतोष नाईक आणि संभाजी दिवेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून श्रवण मिनजगी याला ताब्यात घेतले.
अंगझडतीत त्याच्याकडे विविध बँकाचे १८ एटीएम कार्ड मिळून आले. चौकशीत श्रवणने २४ लोकांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख ४५ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याशिवाय त्याने केलेले लोणी काळभोर, हडपसर, वानवडी, लष्कर, जेजुरी पोलीस ठाण्यातंर्गत दाखल असलेले गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर, तपास पथकाचे एपीआय जयवंत जाधव, संतोष तानवडे, अमजद पठाण, संजय बागल, राजू राजगे, संतोष मोहिते, संतोष नाईक, विनोद भंडलकर, संभाजी दिवेकर, अतुल गायकवाड, सागर जगदाळे, अमित चिव्हे, नवनाथ खताळ, सुधीर सोनावणे, गणेश खरात, दीपक भोईर यांनी केली.