October 19, 2025

पुणे: महाराष्ट्र शासन शहरात कर्करोग रुग्णालय कधी उभारणार; आमदार पठारे यांची मागणी

मुंबई, १६ जुलै २०२५: राज्यातील महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणावर बोलताना आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल (ता. १५) अर्धा तास चर्चा सत्रात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

महिलांमध्ये वाढणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत पठारे यांनी विचारले, “शासन हे लसीकरण मोफत करणार का?” तसेच, ससून हॉस्पिटलसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी मी गेली ११ वर्षे सातत्याने करत आहे. हे रुग्णालय आता तरी शासन उभारणार का?” असा ठोस प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याचबरोबर महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये ब्लड कॅन्सरवरील उपचार, टेस्टिंग, किमोथेरपीसारख्या उपचारपद्धतींचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यभर एचपीव्ही लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती दिली. तसेच, कॅन्सर रुग्णालय स्थापनेसाठी आरोग्य विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली असून आपण सर्वच जण या रुग्णालयासाठी आग्रही राहिलो तर पुढील अर्थसंकल्पात तरतूद होऊ शकते, असे नमूद केले.

आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे आरोग्य सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या माध्यमातून राज्य शासनाच्या आरोग्य धोरणाला दिशा देणारे ठरू शकतात.