September 23, 2025

Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन

पुणे, २२ सप्टेंबर २०२५: शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अद्ययावतीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने ‘अमृत २.०’ योजनेतून ८४२ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. या खर्चात केंद्र सरकारचा २५२.८६ कोटी, राज्य सरकारचा २१०.७१ कोटी, तर महापालिकेचा २०.९० कोटींचा वाटा आहे. उर्वरित ३५८ कोटी रुपये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली.

सध्या महापालिकेच्या हद्दीत कार्यरत असलेले नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) एकूण ४७७ एमएलडी क्षमतेचे आहेत. मात्र, ते केवळ जुने मानके पूर्ण करतात आणि आधुनिक पर्यावरणीय निकषांना अपुरे ठरत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचे अद्ययावतीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर केंद्र व राज्य सरकारने प्रस्तावास मान्यता देत पुणेकरांना दिलासा दिला आहे.

या निधीतून भैरोबा, तानाजीवाडी, बोपोडी, एरंडवणे, विठ्ठलवाडी आणि नायडू (नवीन) येथील प्रकल्पांचे नूतनीकरण व क्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे शहराची सांडपाणी शुद्धीकरण क्षमता ८९ एमएलडीने वाढून ५६६ एमएलडीपर्यंत पोहोचणार आहे. आधुनिक एसबीआर आणि आयएफएएस तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या निकषांचे पालन महापालिकेला करता येणार आहे.

भैरोबा व तानाजीवाडी येथे सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर (SBR) तंत्रज्ञान वापरले जाणार असून, विठ्ठलवाडी, एरंडवणे, बोपोडी आणि नायडू (नवीन) येथे इंटिग्रेटेड फिक्स्ड फिल्म स्लज प्रोसेस (IFAS) तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. बाणेर, खराडी व मुंढवा येथे आधीपासून SBR पद्धत असल्याने त्यांचे नूतनीकरण आवश्यक नाही.

या कामासाठी महापालिकेने तीन ठेकेदारांकडून निविदा मागवून छाननी सुरू केली आहे. दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यानंतर पुण्यातील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेत मोठा बदल होऊन मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी होणार आहे.

सल्लागार नेमून अहवाल तयार
सध्याचे एसटीपी जुने असल्याने त्यातून फॉस्फेट व नायट्रेट वेगळे करता येत नाहीत. यासाठी सल्लागार नेमून सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

तांत्रिक मान्यता
८४२.८५ कोटींच्या सहा प्रकल्प अहवालांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जानेवारी २०२४ मध्ये तांत्रिक मान्यता दिली होती. केंद्र सरकारने मे २०२५ मध्ये अंतिम मंजुरी दिली.

पुणेकरांना दिलासा
या प्रकल्पांमुळे पुण्याच्या सांडपाणी शुद्धीकरण क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन नागरिकांना स्वच्छ व निरोगी पर्यावरणाचा लाभ मिळणार आहे.

“मंजूर निधीतून भैरोबा व तानाजीवाडी येथे नवे प्रकल्प उभारले जाणार आहेत. इतर प्रकल्पांचे आधुनिकीकरण होणार असून, तीन निविदांची छाननी सुरू आहे.”
— पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

प्रकल्पांची क्षमता वाढ

भैरोबा केंद्र – १३० एमएलडीवरून २०० एमएलडी

तानाजीवाडी केंद्र – १७ एमएलडीवरून २६ एमएलडी

बोपोडी केंद्र – १८ एमएलडीवरून २८ एमएलडी

एरंडवणे केंद्र – ५० एमएलडी जैसे थे, पण तंत्रज्ञान नूतनीकरण

विठ्ठलवाडी केंद्र – ३२ एमएलडी जैसे थे, तंत्रज्ञान नूतनीकरण

नायडू (नवीन) केंद्र – ११५ एमएलडी जैसे थे, तंत्रज्ञान नूतनीकरण